डॉ.होमी भाभा
असं म्हणतात की, बालपणी होमी हे फारच कमी झोपायचे. सामाजिकच त्याची आई-वडीलांना चिंता वाटायची. म्हणून वडील  जहांगीर आणि आई मेहरीन त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरनं मुलाची लक्षणं ऐकली आणि माता-पित्यांना आश्‍वस्त केलं की, घाबरण्याचं काहीच कारण नाही. तुमचा मुलगा तल्लख बुद्धिमतेचा आहे. त्यामुळं असं घडतंय. वडील जहांगीर भाभा हे सुद्धा केब्रिजचे विद्यार्थी आणि नामांकित वकील होते. ज्याप्रमाणे डॉक्टरनं सांगितलं. त्याचप्रमाणे मुलगा हुशार निघाला. डॉ.होमी भाभांना भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचं जनक मानलं जातं. 1947 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय अणुऊर्जा आयोगाचे ते पहिले अध्यक्ष होते. ते सुद्धा उच्च शिक्षणासाठी  केब्रिजला गेले. शिक्षणासोबतच त्यांनी गणित व भौतिकशास्त्रात संशोधन केलं. नोबेल पुरस्कार विजेत्या तज्ज्ञांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. दुसर्‍या महायुद्धाच्या सुरुवातीला म्हणजे, 1939 मध्ये ते भारतात आले. होमी भाभा यांनी महागड्या युरेनियमऐवजी भारतात मोठ्या प्रमाणात आढळणार्‍या थोरियमचा वापर अणू प्रकल्पासाठी करता येतो का, या दिशेनं संशोधन सुरु केलं. होमी भाभा यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारतात अणुभट्टीची स्थापना झाली. आणूचा वापर शांततेच्या मार्गानं व्हावा, असं ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक होते.

     तत्कालीन गणितज्ञ पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली होमी भाभा यांनी गणितात प्रावीण्य मिळवलं. सुप्रसिद्ध कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास करुन 1933 मध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली. निल्स बोहर या दिग्गज वैज्ञानिकासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांना मानाचा एडम्स पुरस्कारही मिळाला. त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेमुळे नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण हेही प्रभावित होते. योगायोग पहा, भारतात परतल्यानंतर सी.व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी त्यांना मिळाली. जवाहरलाल नेहरुंना अणू विज्ञानाचं महत्व पटवून देण्याचं महत्त्वाचं काम डॉ.होमी भाभा यांनीच केलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरुंनी अणुऊर्जा प्रकल्पाची जबाबदारी डॉ.भाभांवरच सोपवली.

     डॉ.होमी भाभा यांना भौतिकशास्त्रात आवड होतीच, तसाच मूर्तीकला, संगीत, चित्रकला, आणि नृत्याचाही छंद होता. त्यांच्या बुद्धिमतेचा प्रभाव सर्वच क्षेत्रात जाणवत होता. त्यांच सर्वांगपूर्ण व्यक्तिमत्त्व त्यांच्या बोलण्यातून सुद्धा जाणवत होतं. एकदा ते म्हणाले होते.  “ आयुष्याकडून मला काय हवं आहे, हे मला अतिशय स्पष्टपणे माहीत आहे. केवळ आयुष्य आणि माझ्या भावना या दोघांबाबत मी सावध आहे. माझं आयुष्यातल्या सावधपणावर प्रेम आहे. आणि मला तो जेवढा मिळू शकेल तेवढा तो हवाच आहे. मात्र, आयुष्य काळ मर्यादित असतो. मृत्यूनंतर काय, हे कुणालाही माहिती नसतं. मला त्याची फिकीरही नाही. अर्थातच, मी आयुष्य काळ वाढवून त्यातला आशय वाढवू शकत नाही. मात्र, मी आयुष्याची प्रखरता वाढवून त्याचा आशय वाढवेन.” शाअ महान वैज्ञानिकाचा मृत्यू 24 जानेवारी 1966 रोजी विमान अपघातात झाला.

     डॉ.होमी भाभा यांना श्रद्धांजली देताना जेआरडी टाटा म्हणाले,“ होमी भाभा हे त्या तीन महान व्यक्तीमधील एक आहेत, या विश्‍वात ज्यांना जाणण्याची मला संधी मिळाली. यामध्ये एक महात्मा गांधी, दुसरे जवाहरलाल नेहरु आणि तिसरे डॉ.होमी भाभा हे होते. होमी भाभा हे केवळ गणितज्ञ आणि वैज्ञानिकच नव्हते, तर ते एक महान इंजिनीअर, निर्माते आणि उद्यानकर्मीसुद्धा होते. याशिवाय, ते एक कलाकारही होते. खर्‍या अर्थानं ते एक ‘संपूर्ण मानव’ होते.” जेआरडींनी दिलेली श्रद्धांजली डॉ.होमी भाभांसारख्या महामानवासाठी सार्थ अशीच होती. खर्‍या अर्थानं डॉ.होमी भाभा तरुणांसाठी आदर्श होते आणि राहतील.


Post a Comment

أحدث أقدم